Saturday, July 17, 2010

विचारनिष्ठा वाहणारा माणूस

कलावंत आपल्या ‘कले’मुळे सर्वसामान्यांपेक्षा वेगळा असला, तरी तो समाजाचा घटक असतोच. साहजिकच समाजाच्या बऱ्या-वाईट भागधेयाला तोही जबाबदार असतो. तेव्हा खरं तर त्यानेही विविध प्रश्नांवर व्यक्त व्हायला हवं. ही सामाजिक बांधिलकी प्रत्येक कलावंत दाखवतोच, असं नाही. डॉ. श्रीराम लागू यांच्यासारखे मोजकेच कलावंत मात्र आपली मतं निर्भीडपणे मांडतात.


‘मला वाटतं नियती ही माणसानं शोधून काढलेली एक सुंदर सबब आहे. आपल्याला अमुक एक गोष्ट जमली नाही की, आपण त्याचं खापर या नियतीच्या माथ्यावर फोडून मोकळे होतो. मात्र नियती ही फारच मजेशीर कल्पना आहे; पण ती वस्तुस्थिती नाही..’ इति डॉ. श्रीराम लागू
तीनेक वर्षापूर्वी पुण्यात डॉ. श्रीराम लागू आणि दिवंगत विजय तेंडुलकर यांची ज्येष्ठ पत्रकार-संपादक निखिल वागळे यांनी एकत्रित मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत वागळे यांनी या दोघांनाही नियतीच्या प्रश्नावरून छेडलं असता, तेंडुलकरांनी त्वरित नियतीचं अस्तित्व मान्य केलं. ‘माझ्या आयुष्यात जे घडलं, ते मला तसं घडू द्यायचं नव्हतं, पण माझी नियतीच तशी होती..’ असं उत्तर तेव्हा तेंडुलकरांनी दिलं होतं आणि त्याला त्यांच्या दोन मुलांच्या म्हणजे राजू आणि प्रियाच्या मृत्यूचा संदर्भ होता. तसाच संदर्भ खरं तर डॉ. लागूंच्या बाबतीतही होता. त्यांच्या मुलाचा-तन्वीरचा मृत्यूही असाच अवचित झाला होता. मुंबईहून पुण्याला जाताना गाडीबाहेरून कुणी तरी मारलेला दगड नेमका तन्वीरच्या डोक्यावर बसला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. मात्र तरीही लागूंनी ‘ही आपली नियती’ असं मानलं नाही. उलट नियतीच्या प्रश्नावर त्यांनी वर उद्धृत केलेलं उत्तर दिलं आणि ते ठामपणे म्हणाले- ‘मुलाच्या मृत्यूच्या बाबतीतही ती माझी नियती होती किंवा त्यानंतर आयुष्याकडे बघायची माझी दृष्टी बदलली, असं कुठलंही जनरल विधान मी करणार नाही. प्रवास करत असताना बाहेरून आलेला दगड डोक्याला लागून माझ्या मुलाचं निधन झालं. यात दोष कुणाचा? कुणाला शिक्षा करणार? मी एवढाच विचार केला, अरेच्चा! इतका नेम धरून फक्त परमेश्वरच मारू शकतो. तेव्हा असेल बाबा तो! त्याशिवाय इतकं निष्ठूर कुणी असू शकत नाही. याच्यापलीकडे मला माझ्या जीवनात विचलित झाल्याचं आठवत नाही.’
या उत्तरात लागूंनी दिलेला ईश्वराचा हवाला उपहासात्मक होता. कारण त्यांनी ईश्वराला आपल्या आयुष्यातून कधीच रिटायर केलंय.
अगदी ऐंशीच्या उंबरठ्यावरही डॉ. श्रीराम लागू असे आहेत, विचाराने पक्के. किंबहुना विचारांवरची निष्ठा हाच त्यांच्या ताठ आयुष्याचा कणा आहे. त्याच बळावर ते स्वत:ला पटतं तेच बोलतात आणि शेवटपर्यंत रेटतातही. मग परिणामाचीही पर्वा ते करत नाहीत.
परिस्थितीशी लढण्याचं हे बळ कुठून येतं? असं विचारल्यावर ते म्हणतात, ‘कुठल्याही गोष्टीकडे पाहण्याचे दोन अ‍ॅप्रोच असतात. एक वैचारिक आणि दुसरा भावनात्मक. मी नेहमी वैचारिक अ‍ॅप्रोचने विचार करतो आणि शुद्ध वैचारिक अ‍ॅप्रोच घ्यायचा ठरवला की, तुमची वैचारिक भूमिका तुम्हाला कुठे घेऊन जाईल; त्याचा विचार करून चालत नाही. येईल ते स्वीकारावं लागतं. येईल त्या आपत्तीला तोंड द्यायची तयारी ठेवावी लागते. मी त्यासाठी नेहमीच तयार असतो. शेवटी माणूस विचारानेच सुसंस्कृत बनतो.’
विचार करण्याची क्षमता असणं, ही डॉ. लागूंना माणूस म्हणूनच नव्हे, तर नट म्हणूनही महत्त्वाची गोष्ट वाटते. कलाकाराने फक्त स्वत:च्या कलेपुरतं बघून चालत नाही. त्याच्यात आपल्या कलेपलीकडेही बघण्याची, त्यावर व्यक्त होण्याची कुवत असली पाहिजे. अन्यथा, एक कलावंत म्हणून तो तोकडा ठरेल, असं त्यांचं म्हणणं आहे. ते सांगतात, ‘वेगवेगळ्या विषयांचं किती ज्ञान आहे, यावरून कलावंताची उंची ठरत असते. एखाद्याला स्वत:ची कला सोडून बाकीच्या क्षेत्रांत काहीच गती नसेल किंवा तो विचार करत नसेल, तर त्याच्या कलेविषयीच मुळात प्रश्न निर्माण होईल किंवा त्याची कला कोणत्या योग्यतेची आहे, असा प्रश्न निर्माण होईल. कारण जो खरा नट किंवा कलावंत असतो, तो स्वत:च्या कलेबरोबर इतर जगाविषयीही औत्सुक्य बाळगून असतो.’
डॉ. लागू म्हणतात तशा बुद्धिमान कलाकारांची मराठी रंगभूमीवर कमी नाही. पण त्यातही बुद्धिमान आणि विचार करू शकणारा असा भेद डॉ. लागू करतातच. नटाने कसं असावं, याचं सूचन करताना ते म्हणतात- ‘जन्माला येणा-या प्रत्येकाला कमी-अधिक प्रमाणात बुद्धी असते. कलावंताला तर बुद्धीची जास्तच गरज लागते. पण कलावंताकडे नुस्ती बुद्धी असून चालत नाही. कलावंत हा अ‍ॅरिस्टॉटलने म्हटल्याप्रमाणे- ही शुड बी ए अ‍ॅथलिट अँड फिलॉसॉफर- असा असला पाहिजे. म्हणजे शारीरिकदृष्ट्या तो अ‍ॅथलिट असला पाहिजे आणि बौद्धिकदृष्ट्या तो फिलॉसॉफर असला पाहिजे. त्याच्याकडे अंगाची लवचिकता हवीच. पण जोडीला बुद्धीला वाकवणारी एखाद्या तत्त्वज्ञासारखी विचारक्षमताही हवी. त्याची ही प्रखर विचारनिष्ठा उठून दिसली पाहिजे. कारण अभिनय म्हणजे केवळ आंगिक किंवा केवळ वाचिक भावप्रदर्शन नव्हे; तर अभिनय म्हणजे भूमिकेसंबंधीच्या विचारांचंही प्रदर्शन असतं. एखादा कलाकार भूमिकेचा कसा विचार करतो, तेही त्याच्या अभिनयातून दिसत असतं. दिसायला हवं.’
यातूनच आपल्या जगण्याबद्दल, समाजाबद्दल, नाटकांतील भूमिकांबद्दल डॉ. लागू सतत विचार करत असतात. हा विचार केवळ अभिनेता म्हणून नसतो. मुळात तो माणूस म्हणून असतो. कारण माणूस आधी जन्माला येतो आणि कलाकार नंतर. हा विचार करताना या टप्प्यावर त्यांना आपण माणूस आणि अभिनेता दोन्हीला न्याय दिला याचं समाधान आहे. त्यातही कलेला न्याय देऊ शकलो याचा आनंद अधिक आहे. कारण लागूंनी जेव्हा नाटकात करियर करायचा विचार केला, तेव्हा नाटकात काम करणं अप्रतिष्ठेचं मानलं जायचं. त्यामुळे त्यांच्या घरातूनही त्यांना विरोधच झाला. त्याबद्दल डॉ. लागू सांगतात-‘मी मॅट्रिक झाल्यावर वडिलांनी मला विचारलं की, आता मॅट्रिक झालात पुढे काय करणार? मी म्हटलं, ‘मला नट व्हायचंय.’ ते ऐकल्याबरोबर त्यांनी पहिल्यांदा खाडकन् माझ्या मुस्कुटात लगावली नि म्हणाले,‘म्हणजे तुम्ही कसला विचार केलेला नाही. नाटकात काम करून रस्त्यावर भीक मागायचीय का?’ त्यांचं सरळसाधं गणित होतं. गणित चांगलं असेल, तर इंजिनीयरिंगला जावं आणि विज्ञान चांगलं असेल, तर मेडिकलला जावं. पण अशा थातुरमातुर गोष्टींवर आयुष्यात काय करायचं, यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी आपण अवलंबून ठेवतो, हेच मला तेव्हाही पटलं नव्हतं आणि आताही पटत नाही. पण त्यांची इच्छा होती की, मी डॉक्टर व्हावं, म्हणून मी डॉक्टर झालो. पण नाटक हाच माझा मी पहिला प्राण मानला आणि लवकरच रंगभूमीकडे वळलो. परंतु वडिलांनाही दोष देता येत नाही. कारण पूर्वीपासूनच कला हा शब्द एवढा मिसयूज्ड आहे की, त्यामुळे त्याच्याकडे निकोपदृष्ट्या पाहिलंच जात नाही.’
वडिलांनी नाटकात काम करायला विरोध केला, तेव्हा खरं तर लागूही या कलेविषयी साशंकच होते. त्यांच्या मनातला नाटक आणि सामाजिक अप्रतिष्ठेचा गुंता सुटला नव्हता. परंतु ते परदेशात शिकायला गेले, त्यांनी तिथली रंगभूमी पाहिली, तिथल्या कलाकारांना मिळणारी सामाजिक प्रतिष्ठा पाहिली; तेव्हाच त्यांच्या मनातली हा गुंता सुटला आणि त्यांनी भारतात परतल्यावर लगेच डॉक्टरकीबरोबर नाटकांत काम करायलाही सुरुवात केली. अर्थात, नाटकांत काम करायला सुरुवात केल्यावर त्यांना सामाजिक अप्रतिष्ठेला कधीच सामोरं जावं लागलं नाही. उलट समाजात मानच मिळाला.
मात्र पूर्वी आपण केलेल्या ‘गिधाडे’सारख्या नाटकांपासून ते आजतागायत विविध नाटक-सिनेमा-साहित्यकृतींना समाज, शासक विरोध करतात, तेव्हा त्यांना दु:ख होतं. किंबहुना या सा-याची प्रचंड चीड येते. ते म्हणतात, ‘गिधाडे नाटकाबद्दल तेव्हा उगाचच वाद निर्माण झाला होता. यातली पात्रं अश्लील बोलतात नि वागतात असा एक आक्षेप होता. पण या नाटकातली पात्रं समाजाच्या सांस्कृतिक -हासाची बळी आहेत; हे कुणाच्या लक्षातच येत नव्हतं. अर्थात, या परिस्थितीत अजून फरक पडलेला नाही.’
केवळ ‘गिधाडे’तली पात्रंच नाही, गेल्या काही दिवसांत सर्वत्र बलात्काराच्या, आत्महत्यांच्या सातत्याने ज्या घटना घडत आहेत ते पाहून, यालाही सद्यकालीन समाजाचा सांस्कृतिक -हासच जबाबदार असल्याचं डॉ. लागूंचं म्हणणं आहे. या संदर्भात विवेचन करताना ते म्हणतात, ‘आज ज्या पद्धतीने समाजात गुन्हेगारी, अनाचार वाढला आहे, हे सांस्कृतिक ऱ्हासाचंच लक्षण आहे. पण केवळ अशा समाजविघातक घटनाच सांस्कृतिक -हासाच्या निदर्शक आहेत, असं नाही. माझं तर म्हणणं आहे की, युद्धसुद्धा सांस्कृतिक ऱ्हासाचाच भाग आहे. कुठल्या तरी कारणाने एका देशाने दुस-या देशाशी युद्ध करणं, हा मानवजातीला लागलेला कलंक आहे. माणूस आहात तर माणसाचे प्रश्न तुम्ही माणसासारखेच सोडवले पाहिजेत, जनावरासारखे नाहीत. ‘बळी तो कान पिळी’ हा जनावरांचा कायदा आहे, तो माणसाचा असता कामा नये.’
म्हणजे अलीकडच्या काळातही सांस्कृतिक -हास मोठ्या प्रमाणावर सुरू आहे, असं वाटतं का?
‘नाही, तसं काही नाही. यातही गंमत अशी आहे की, प्रत्येक कालखंडात सांस्कृतिक आणि असांस्कृतिकतेचं जे प्रमाण आहे ना, त्यात फारसा फरक नसतोच. रामायण-महाभारतापासून हे असंच चालत आलंय. भावाभावांत युद्ध होणारा तो काळ होता. म्हणजे मग त्या काळाला सुसंस्कृत म्हणायंच की असंस्कृत? द्रौपदीला भरसभेत आणून विवस्त्र करणारा तेव्हाचा समाज सुसंस्कृत कसा म्हणायचा? तरीही त्या काळाला सत्ययुग वगैरे म्हटलं जातंच. म्हणजे प्रश्न एवढाच आहे की, कुठल्याही काळात माणसाचा सुसंस्कृत होण्याचा प्रयत्न चालू असला पाहिजे. तो ज्या दिवशी थांबेल तेव्हा चिंतेचं खरं कारण निर्माण होईल. जोपर्यंत तो प्रयत्न चालू आहे, अगदी छोट्या पातळीवरही; तोपर्यंत माणसाला आशा ठेवायला हरकत नाही. पण ज्या वेळी सगळेच दुयरेधन (ही फक्त सोयीसाठी घेतलेली उदाहरणं आहेत.) निपजू लागतील, तेव्हा माणसाला संस्कृती- भविष्य काहीही राहाणार नाही,’ लागू सांगतात. पण डॉक्टर केवळ सांस्कृतिक-सामाजिक -हासापर्यंतच येऊन थांबत नाहीत. त्यांना मनुष्यप्राण्याच्या सांस्कृतिक विकासाबद्दलही प्रश्न आहेत आणि म्हणूनच ‘माणूस’ हा मानवी उत्क्रांतीचा-संस्कृतीचा एण्ड असेल, तर ते दु:खदायक आहे, असं ते म्हणतात. या संदर्भातली भूमिका स्पष्ट करताना ते म्हणतात,‘डार्विनने उत्क्रांतीची जी थिअरी मांडली ती माणूस या ‘प्राण्या’बद्दल आहे. म्हणजे माणूस हा जैवसंस्कृतीचा एक भाग आहे. माणूस या प्राण्याचा सांस्कृतिक विकास जो होत गेला, त्याच्यात माकड नावाचा ‘प्राणी’ माणूस नावाच्या ‘प्राण्या’पर्यंत येऊन पोहोचला आहे. पण त्याच्याही पुढे त्याला जायचंय. पुढे मग माणसाचं काय होईल माहीत नाही. ही सांस्कृतिक प्रोसेस आहे. माणूस हा काही सांस्कृतिक एण्ड नाही. माणूस हा जर संस्कृतीचा शेवट असेल, तर त्याच्याएवढी दुसरी ट्रॅजेडी नाही.’
‘उत्क्रांती’ या शब्दाला डॉक्टरांच्या लेखी खूपच महत्त्व आहे. कारण प्रत्येक गोष्ट कुठल्या तरी आधीच्या गोष्टीतूनच उत्क्रांत होत असते. अगदी अभिनयदेखील. अर्थात, ही उत्क्रांती म्हणजे एकप्रकारे आत्मशोधच असतो आणि आत्मशोध हेच कलेचं एकमेव प्रयोजन असलं पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. ते सविस्तर स्पष्ट करताना ते म्हणतात, ‘मी असं सांगणारा माणूस आहे की, सगळी कला ही आत्मशोधातूनच उगम पावलेली आहे. गुहेमध्ये राहणा-या माणसाला तिथल्या पत्थरावर कोरून चित्रं का काढावीशी वाटली? तर त्याला कुठे तरी माणूस या प्राण्याबद्दल असमाधान असले पाहिजे. म्हणजे माणसाच्या पलीकडली कुठली तरी स्टेज असणार वगैरे..जेव्हा उत्क्रांतीवाद सिद्ध झाला, त्या वेळेला तर हे सिद्धच झालं की हा काही शेवट नाही. नटाचं उदाहरण घेऊन आपण हे स्पष्ट करू. पन्नास वर्षापूर्वीचे नट घ्या. ते ज्या पद्धतीने अ‍ॅक्टिंग करायचे, ते पाहून आम्ही तेव्हा म्हणायचो की, हे एवढा आरडाओरडा का करतायत? ते बरोबर वाटायचं नाही. तेव्हा ते सर्व नावाजलेले नटच होते. पण तेव्हाचा त्यांचा अभिनय अतिरेकी होता आणि त्याची रिअ‍ॅक्शन म्हणून मग माणूस जसा व्यवहारात वागतो, तसा नाटकात वागायला लागला. ही उत्क्रांतीच आहे, अभिनयाच्या क्षेत्रातली.
आजच्या छोट्या-मोठ्या गोष्टींवरून लादल्या जाणा-या सेन्सॉरशिपबद्दलही डॉक्टरांना प्रचंड राग आहे. कारण सेन्सॉरशिप म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्याचा केलेला संकोच, असं त्यांचं स्पष्ट मत आहे. पण ते केवळ सेन्सॉरशिप लादणा-यालाच फटकारत नाहीत; ती सहन करणा-यालाही फटकारतात. म्हणतात, ‘सेन्सॉरशिप ही मग्रुरी आहे. तो उद्धटपणा आहे. ती लादणारे तुम्ही कोण आणि ती आम्ही सहन का करावी? असे प्रश्न सेन्सॉरशिप लादणा-यांना विचारले गेले पाहिजेत. तसे जर विचारले गेले नाहीत, तर ती सहन करणा-याचीही चूक ठरेल. ‘गिधाडे’च्या वेळी आम्ही असे प्रश्न विचारले, त्याविरुद्ध लढलो. कारण सामाजिक अभिसरण ज्याला आपण म्हणतो, त्याचे निकष तू जे लावलेले आहेस, तेच मी लावले पाहिजेत, असा कुणाचा हट्ट कसा काय असू शकतो? तसं झालं, तर सामाज हा एखाद्या सैन्यासारखा होईल कवायत करणारा. तेव्हा सेन्सॉरशिप अयोग्यच!’
‘मी नथुराम बोलतोय’ किंवा ‘लज्जा’ किंवा हुसेनच्या वादग्रस्त चित्रांकडे याच नजरेने बघाल? - अर्थातच. जे म्हणायचंय, जे मांडायचंय, त्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला असलं पाहिजे. मात्र त्या प्रत्येक कृतीला मी ‘कलाकृती’ म्हणेनच असं नाही. कलेचे निकष लावून जर त्या कलाकृती ठरत असतील, तर त्या कलाकृती.. केवळ नाटक या फॉर्ममध्ये काही तरी लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये भयानक चुका असतील, तर मी म्हणेन की हे नाटकच नाही. हेच हुसेनच्या चित्रांना, तस्लिमाच्या लेखनाला लागू पडतं. हुसेनला असं वाटतं की, हे चित्र मला असं रंगवायला-काढायला पाहिजे, तर त्याच्यात काय वाईट आहे? आणि लिखाणाबद्दल म्हणाल, तर त्याला मुळी काही बेसच नाही.. जे आपल्याकडे अश्लील मानलं जातं, ते दुस-या देशात अश्लील मानलं जातंच असेल असं नाही. म्हणून कुठल्याही कलेवर बंधनं आणताना त्यात भावनात्मकता आणू नये. जर कुणाच्या भावना दुखावल्या जात असतील, तर त्याने त्या कलाकृतीकडे फिरकू नये. पण कुणाच्या मोजक्यांच्या भावना दुखावतात म्हणून संपूर्ण जगाच्या भावना दुखावल्या जात असतील, असा क्लेमही त्याने करू नये. तुम्ही स्वत:बद्दल बोला, इतरांच्या वतीने नको. प्रत्येकाचं स्वातंत्र्य आपण स्वीकारलं पाहिजे. ते स्वीकारणं म्हणजे सामाजिक सभ्यता. संस्कृतीरक्षकांची विचार करण्याची प्रोसेस थांबलेली असते, असं मला वाटतं. पूर्वजांनी केलं तेच आपण केलं पाहिजे, असं म्हणणं हा ‘विचार’ शब्दाचा अपमान आहे. विचार ही गोष्ट प्रत्येक माणसाने स्वतंत्रपणे केली पाहिजे आणि स्वातंत्र्य आपण किती प्रमाणात अ‍ॅक्सेप्ट करतो, त्यावर त्या माणसाची, समाजाची संस्कृती अवलंबून असते. संस्कृतीचा बेस स्वातंत्र्य असला पाहिजे. विचाराचं, वाणीचं, कृतीचं स्वातंत्र्य आणि त्या स्वातंत्र्याची पहिली अट ही पाहिजे की, त्याने दुस-या कुणाचं नुकसान
होणार नाही.’
डॉ. लागू स्वत: हे भान नेहमीच ठेवत आलेत. त्यांनी आपलं विचार, उक्ती आणि कृती स्वातंत्र्य नेहमीच जपलं. परंतु या स्वातंत्र्याचा गैरवापर त्यांनी केला नाही. अगदी नियती किंवा परमेश्वराला रिटायर करतानाही, त्यांनी ‘ज्यांना देव मानायचा आहे, त्यांनी मानावा,’ असंच म्हटलं होतं. आपले विचार ते इतरांवर लादत नाहीत, पण दुस-याला आवडत नाही, म्हणून मांडायचेही थांबत नाहीत.
शेवटी विचार-आचाराचं ‘स्वातंत्र्य घ्या आणि स्वातंत्र्य द्या’ हेच तर त्यांच्या आयुष्याचं सार आहे!

1 comment:

  1. हाय मुकुंद, लेख वाचला आताच तुझा डॉ. लागू बद्दलचा, चांगला आहे, पण मला वाटत, डॉ. लागू बरोबरच तुझंही मत जाणून घ्यायला आवडेल मला. किंबहूना ते जरुरीच आणि गरजेच आहे. असो,
    एक प्रश्न आहे मनात
    डॉ. लागू म्हणतात तसं
    ‘कुठल्याही गोष्टीकडे पाहण्याचे दोन अ‍ॅप्रोच असतात. एक वैचारिक आणि दुसरा भावनात्मक. मी नेहमी वैचारिक अ‍ॅप्रोचने विचार करतो आणि शुद्ध वैचारिक अ‍ॅप्रोच घ्यायचा ठरवला की, तुमची वैचारिक भूमिका तुम्हाला कुठे घेऊन जाईल; त्याचा विचार करून चालत नाही. येईल ते स्वीकारावं लागतं. येईल त्या आपत्तीला तोंड द्यायची तयारी ठेवावी लागते. मी त्यासाठी नेहमीच तयार असतो. शेवटी माणूस विचारानेच सुसंस्कृत बनतो.’
    पण भावनात्मक विचार नसतो का, कितीही नाकरला तरी तो असतोच असतो आणि तो ही माणसाला घड्वतच असतो,
    असो मी फक्त मला वाटल ते म्हणतोय लेख खरच खूप मस्त आहे, थोडा फिलोसॉफीच्या अंगाने असल्यामुळे बोललो माझा आवडता विषय रे.
    भेटू लवकरच
    प्रशांत, btw

    ReplyDelete