Wednesday, July 14, 2010

‘लोकप्रियते’मुळे साहित्याची परवड

कविकुलगुरू कालिदासापासून ते आजच्या संदीप खरेपर्यंत कविकुलातील अनेकांना ‘लोकप्रियते’ची बाधा झालेली आहे. बहुतेकांनी लोकप्रियता हेच आपल्या कवितेचं यश मानलं. पण ‘लोकप्रियता’ हा साहित्याच्या गुणवत्तेचा निकष नाही, हे आजही भल्याभल्यांच्या लक्षात आलेलं नाही..

लोकप्रियता..!
लोकप्रियता म्हणजे काय? तर रुढार्थाने एखाद्या कलावंताला-साहित्यिकाला त्याच्या कलेमुळे समाजात मिळालेली मान्यता. ती कधी क्षणिक असते. काही काळापुरती, एखाद्या कलाकृतीपुरती. तर कधी ती चिरकाल टिकणारी असते, कलावंत-साहित्यिकाच्या एकूणच योगदानाचं संचित म्हणून! कविकुलगुरू कालिदास, बोरकर, कुसुमाग्रज यांना मिळालेली लोकप्रियता या दुस-या प्रकारातली आहे.
पण म्हणून लोकप्रियता, म्हणजेच पर्यायाने समाजमान्यता नेहमीच योग्य व्यक्तीला आणि कलाकृतीला मिळतेच असं नाही. उलट अनेकदा लोकप्रियता त्यालाच मिळते, जो तत्कालीन समाजाच्या दांभिक मनोवृत्तींचा अनुनय आपल्या कलेतून करतो. समाजात बुद्धिगामी किंवा विचारगामी लोकांची संख्या नेहमीच कमी असते आणि उथळ व परंपरावादी संख्येने जास्त असतात. लोकप्रियता लाभते ती, अशाच संख्येने जास्त असलेल्या समाजाच्या भावनांचा अनुनय जो आपल्या लेखनातून-कलेतून करतो त्याला.
कालिदासापासून पाडगावकरांपर्यंत ते आजच्या प्रवीण दवणेंपासून संदीप खरेपर्यंत गाणा-य़ा सा-या कवींनी, नेहमीच समाजाच्या मोठय़ा वर्गाला जे हवं तेच देण्याचा प्रयत्न केलाय. मोठय़ा समाजाला सुभग, सुबक आणि गेय कविता आवडते, मग तशीच कविता करा. त्यांना लालित्यपूर्ण शब्द आवडतात, मग तशा शब्दांसाठी खटपट करा! त्यांना गायलेली कविता आवडते, मग त्यांच्यासाठी गाऊन दाखवा. आपली कला अशी समाजशरण केल्यामुळेच कालिदासापासून आजच्या प्रवीण दवण्यांपर्यंत अनेकांना लोकप्रियता मिळालेली आहे.
अशी लोकप्रियता नेहमीच फसवी असते; किंबहुना ती कलावंतातील प्रयोगशीलता संपवणारी असते. आज एखाद्या जाणत्या रसिकाला पाडगावकरांची कविता वाचायला दिली की, काही कविता वाचल्यानंतर त्यांना लगेच पुढच्या कविता कोणत्या उपमा-उत्प्रेक्षांभोवती फिरत राहणार ते उमगतं. प्रवीण दवणे शब्दांशी कसे लाडे लाडे खेळणार ते कळतं. अगदी नलेश पाटील पुढची कविता कशी गाऊन दाखवतील, तेही समजतं. कालिदासाचंही हेच झालंय. त्याच्या नाटकांची आणि त्यातल्या पात्रांची नावं बदलतात. पण त्यातले प्रसंग, वर्णनं सारखीच असतात.
अन् तरीही लोकांना ते आवडतं. कारण समाज आपल्या भावना त्यात पाहतो. ज्या पद्धतीने श्रीमंती थाटाच्या कृतक मालिका बघितल्या जातात, त्याच पद्धतीने हे ‘लोकप्रिय’ साहित्य वाचलं जातं. म्हणजेच अनेकदा कुठल्याही कलेच्या लोकप्रियतेमागे ‘करमणूक’ किंवा ‘मनोरंजन’ हे एक मूल्य असतं. अर्थात करमणूक ही समाजाची गरजच आहे. त्यात हीन लेखण्यासारखं काही नाही. मात्र लोकप्रियतेसाठी सतत आपली कला करमणुकीच्या पातळीवरच ठेवली, तर मात्र त्या कलावंताच्या कलेला हीनपणा येऊ शकतो. कारण करमणूक अनेकदा रसिकांच्या फक्त भावनेला हात घालते, विचारांना नाही. करमणुक रसिकांना भावसमृद्ध करते, विचारप्रवण बनवत नाही. आणि त्यामुळेच आजवर जे साहित्य समाजाच्या भावनेला हात घालत आलं, तेच लोकप्रिय झालंय. पण ज्या साहित्याने विचार देण्याचा प्रयत्न केला, ते साहित्य मात्र नाकारलं गेलंय. हे विचारप्रधान साहित्य वाचणाऱ्यांचा गट नेहमी अल्पच राहिला, तो कधी बृहत् झालाच नाही.
‘लोकप्रियता’ या मूल्याने कलेवर सगळ्यात मोठा आघात केलाय, तो इथेच. लोकप्रियतेमुळे अनेक कवी-कलाकार शक्यता असतानाही कलेची आवश्यक ती उंची गाठू शकलेले नाहीत. किंवा त्यांना आपल्या कलेतली भावप्रवणता आणि विचारप्रवणता यांची सम गाठता आलेली नाही. शेवटी भावनेला विचारांची जोड दिली, तरच त्याचा परिणाम खोलवर होतो. अन्यथा काव्य रसिकप्रिय होतं, पण प्रसंगी रसिकांमध्ये सारासार विवेक जागवण्याची ताकद त्या काव्यात राहात नाही.
कलेने अशी भाववादी किंवा विचारवादी भूमिका घ्यावी का, हा चिरंतन प्रश्न कायम आहेच. पण त्याचा गुंता सोडवण्याआधी साहित्य असो वा नृत्य, कुठल्याही कलेने ‘कला’ म्हणून असलेलं आपलं मूल्य जपलं पाहिजे. हे मूल्य जपलं गेलं, तरच कुठलीही कृती ‘कला’कृती ठरते. दिवंगत कवी-समीक्षक विंदा करंदीकर ‘परंपरा आणि नवता’ या आपल्या पुस्तकात एके ठिकाणी ‘कलाकृती’ची नेमकी व्याख्या करताना म्हणतात-‘ललित लेखक जाणिवेशी एकनिष्ठ राहिला, तरी तेवढय़ाने कलाकृती निर्माण होईलच असे म्हणता येणार नाही. ती अट आवश्यक असली, तरी पुरेशी नाही. सौंदर्याची रचनात्मक तत्त्वे त्या जाणिवेत अंतर्भूत झालेली असल्याशिवाय त्या वाङ्मयाला कलात्मक मूल्य प्राप्त होणार नाही.’
आज जी साठोत्तरी किंवा नव्वदोत्तरी कविता फार लोकप्रिय नाही, त्यामागे हे एक कारण आहे. ती अधिकाधिक जीवननिष्ठ-आत्मनिष्ठ- तपशीलनिष्ठ बनत चाललीय. व्यष्टी ते समष्टी असा दुवाही तिने जोडून घेतलाय. पण हे सारं करताना त्यातलं कलामूल्य मात्र हरवत चाललंय. ती अधिकाधिक कोरडी, शुष्कहोत चाललीय. .. आणि त्याचाच फायदा घेऊन नको ते कवी-कलावंत लोकांच्या फक्त भावनेला हात घालून ‘लोकप्रिय’ होत आहेत. (संदीप खरेचे उदाहरण याबाबत पुरेसे बोलके आहे.) अर्थात केवळ ‘लोकप्रियता’ हे श्रेष्ठ कलाकृतीचं व्यवच्छेदक लक्षण नाही. उलट लोकप्रिय न झालेल्या अनेक साहित्यकृती या साहित्य म्हणून नि:संशय श्रेष्ठ आहेत. पण लोकप्रियतेत समाजमान्यता अंतर्भूत असल्यामुळे अनेक जण या लोकप्रियतेच्या मागे लागतात आणि आपल्यातली प्रयोगशीलता-सर्जनशीलता
हरवून बसतात. शेवटी ‘लोक’ आपल्यामागे यावेत, अशीच त्यांची अपेक्षा असते आणि आपल्या लेखनाला प्रतिष्ठा मिळावी, असं कुठल्याही लेखक-कवी-कलावंताला वाटणं साहजिकच आहे. पण ‘लोकप्रियता’ कमावताना आपण सत्त्व गमावतोय याचं भान प्रत्येक कलावंताने ठेवायलाच हवं. लोकप्रियतेमुळे कालिदास-पाडगावकर-दवणे होता येईल. पण अश्वघोष, शूद्रक, भास किंवा मर्ढेकर, करंदीकर, सुर्वे, ढसाळ, चित्रे, कोलटकर व्हायचं असेल, तर ‘लोकप्रियते’चं मूल्य मानणं थांबवावंच लागेल.

3 comments:

  1. Aaavdla buaa lekh tuza.. mala shikav tuzyasarkh lihayla...

    ReplyDelete
  2. छान लेख. पूर्णतः पटला. संदीप खरे तर कवी नसून जाहिरात कंपन्यांमधला तिस-या दर्जाचा कॉपी रायटर असे वाटते.
    आपल्याकडे भावनाप्रधान कविता श्रेष्ठ ठरवण्यात आली आहे कारण ती भिडते वगैरे म्हणे. विचारनिष्ठ किंवा त्या पलिकडचे काही मांडणारी कविता मागे पडते. एकूणच मराठी समाजाला किंवा भारतीयांनाच विचार करणं नको असं वाटत आलं असल्यासारखं वाटतं...

    ReplyDelete
  3. प्रिय मुकुंदादा,
    लिखाण पहिल्यापासून आवडतंय. मात्र मटात गेल्यापासून नवीन काहीतरी लिहिलं की नाही. जर लिखाणाचं दर्शन होऊ द्या. सर्व लेख छान आणि मस्त, अभ्यासपूर्ण असतात

    ReplyDelete